This Site Content Administered by
पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन "मन की बात"द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 नोव्हेंबर 2017)

 


मुंबई, 26-11-2017

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली. टाईम्स ग्रुपच्या ‘विजय कर्नाटका’ वर्तमानपत्राने एक उपक्रम राबवला, ज्यात त्यांनी बालकांना, पंतप्रधानांना पत्र पाठविण्याचा आग्रह केला. त्यापैकी काही निवडक पत्रे छापण्यात आली. ती पत्रे वाचल्यानंतर मला फार बरे वाटले. या अगदी लहान मुलांनाही देशातील समस्यांची जाण आहे, देशात सुरू असलेल्या चर्चाही त्यांना माहिती आहेत. अनेक विषयांवर या बालकांनी लिहिले आहे. उत्तर कन्नड मधील किर्ती हेगडे हिने, डिजीटल  इंडिया आणि स्मार्ट शहर योजनांचे कौतुक करत, आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदलाची गरज असल्याचे नमूद केले. हल्लीच्या मुलांना वर्गात बसून वाचन करणे आवडत नाही, त्यांना निसर्गाबद्दल जाणून घ्यायला आवडते. जर मुलांना निसर्गाबाबत अधिक माहिती दिली तर पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ते भविष्यात उपयुक्त ठरेल, असेही तिने लिहिले आहे.

लक्ष्मेश्वरा येथील रीडा नदाफ़ नावाच्या मुलीने लिहिले आहे की ती लष्करातल्या एका जवानाची मुलगी आहे आणि तिला या गोष्टीचा अभिमान वाटतो. लष्करातल्या जवानाचा अभिमान कोणत्या भारतीयाला वाटणार नाही? आणि तुम्ही तर त्या जवानाची कन्या आहात, तुम्हाला अभिमान वाटणे अगदी स्वाभाविक आहे. कलबुर्गीहून इरफ़ाना बेग़म यांनी म्हटले आहे की त्यांची शाळा त्यांच्या गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे त्यांना घरातून लवकर निघावे लागते आणि घरी परतायलाही उशीर होतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रमंडळींसोबत जास्त वेळ खेळता येत नाही. त्यांच्या घराजवळ शाळा असावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. देशवासियांनो, एका वर्तमानपत्राने पुढाकार घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला आणि त्यामुळे ही पत्रे माझ्यापर्यंत पोहोचू शकली, ती वाचायची संधी मला मिळाली. माझ्यासाठी सुध्दा हा फार चांगला अनुभव होता.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 26/11 आहे. 26 नोव्हेंबर हा आपला संविधान दिवस आहे. 1949 साली आजच्याच दिवशी संविधान सभेने भारताची घटना स्वीकारली होती. 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. भारताची राज्यघटना हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. आजचा दिवस हा संविधान सभेच्या सदस्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संविधानाची रचना करण्यासाठी त्यांनी सुमारे तीन वर्षे कठोर मेहनत घेतली. त्यावर झालेल्या चर्चा वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण होते. देशाला समर्पित विचार म्हणजे काय, हे त्यावरून समजते. वैविध्याने समृद्ध असलेल्या आपल्या देशाचे संविधान तयार करण्यासाठी त्यांनी किती मेहनत केली असेल, याची कल्पना आहे तुम्हाला? योग्य समज आणि दूरदर्शी विचार केला असेल त्यांनी. आणि ते सुद्धा अशा वेळी, जेव्हा देश पारतंत्र्याच्या बेड्यांमधून मुक्त होत होता, तेव्हा. याच संविधानाच्या प्रकाशात, घटनेची रचना करणाऱ्यांच्या विचारांच्या प्रकाशात नव भारताची निर्मिती करणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपली राज्यघटना व्यापक आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र, निसर्गातील कोणताही विषय त्यात वगळलेला नाही. सर्वांसाठी समानता आणि सर्वांप्रती संवेदनशीलता, ही आपल्या राज्यघटनेची ओळख आहे. आपली राज्यघटना, देशातील गरीब, दलित, मागास, वंचित, आदिवासी, महिला अशा सर्व स्तरांतील प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करते आणि त्यांचे हित अबाधित राखते. आपल्या राज्यघटनेचे अक्षरश: पालन करणे, हे आपले कर्तव्य आहे. नागरिक असो वा प्रशासक, प्रत्येकाने संविधानाला अनुसरूनच वर्तन केले पाहिजे. कोणाचेही, कशाही प्रकारचे नुकसान होऊ नये, हाच राज्यघटनेचा संदेश आहे. आज, संविधान दिनाच्या प्रसंगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण येणेही स्वाभाविक आहे. या संविधान सभेत महत्वपूर्ण विषयांसंदर्भात 17 स्वतंत्र समित्यांची स्थापना करण्यात आली होती. यातील मसुदा समिती ही एक सर्वात महत्वाची समिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. फार मोठी भूमिका ते निभावत होते. आज ज्या राज्यघटनेचा आपल्याला अभिमान वाटतो, त्याच्या निर्मितीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाचा अमिट ठसा आहे. समाजातील प्रत्येक वर्गाचे कल्याण होईल, याची खातरजमा त्यांनी केली. 6 डिसेंबर रोजी, त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी आपण त्यांचे स्मरण करतो, त्यांना वंदन करतो. देशाला समृद्ध आणि सशक्त करण्यात बाबासाहेबांचे फार मोठे योगदान आहे. 15 डिसेंबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची पुण्यतीथी आहे. शेतकऱ्याचा सुपुत्र ते लोह पुरूष अशी ओळख निर्माण करणारे सरदार पटेल यांनीही देशाला एका समान सूत्रात बांधण्याचे असामान्य कार्य केले. सरदार पटेल सुद्धा संविधान सभेचे सदस्य होते. ते मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आणि आदिवासी यांच्या साठीच्या सल्लागार समितीचेही अध्यक्ष होते.        

26/11 हा आपला संविधान दिवस आहे. मात्र नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 26/11 रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, हे सुद्धा देश विसरू शकत नाही. आजच्या दिवशी ज्या शूर नागरिकांनी, पोलिसांनी आणि सुरक्षा रक्षकांनी आपले प्राण गमावले होते, त्यांना देश वंदन करतो आहे, त्यांचे स्मरण करतो आहे.  त्यांचे बलिदान देश कधीही विसरू शकणार नाही. दहशतवादाने आज, जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी आणि एका अर्थाने, जवळ-जवळ रोजच होणाऱ्या घटनेचे रूप धारण केले आहे. आपण, म्हणजेच भारत तर गेली 40 वर्षे दहशतवादामुळे बरेच काही सोसत आहे. आमच्या हजारों निर्दोष नागरिकांनी आपले प्राण गमावले. काही वर्षांपूर्वी जेव्हा भारत दहशतवादाबाबत जगासमोर चर्चा करत असे, दहशतवादाच्या भयंकर संकटाबाबत चर्चा करत असे, तेव्हा जगातील अनेक लोकांना त्याचे गांभिर्य वाटत नव्हते. मात्र आज, दहशतवादाने त्याच देशांमध्ये थैमान घालायला सुरूवात केल्यानंतर जगातील प्रत्येक सरकार, खरे तर मानवतेवर, लोकशाहीवर विश्वास असणारी सर्वच सरकारे दहशतवादाकडे एक मोठे आव्हान म्हणून पाहत आहेत. दहशतवादाने जगातील मानवतेलाच आव्हान दिले आहे. मानवी शक्ती नष्ट करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. आणि म्हणूनच केवळ भारतानेच नाही तर जगातील सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येऊन दहशतवादाला पराभूत केले पाहिजे. या भूमीवर जन्मलेले भगवान बुध्द, भगवान  महावीर, गुरु नानक, महात्मा गांधी यांनीच जगाला अहिंसा आणि प्रेमाचा संदेश दिला आहे. दहशतवाद आणि उग्रवाद आमच्या सामाजिक रचनेला कमकुवत करून, ती उध्वस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि म्हणूनच मानवतावादी शक्तींनी अधिक जागरूक राहावे, ही काळाची गरज आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, 4 डिसेंबर रोजी आपण नौदल दिवस साजरा करू. भारतीय नौदल आपल्या सागरी किनाऱ्यांचे संरक्षण करते. नौदलाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो. नद्यांच्या किनारी परिसरातच आपल्या संस्कृती विकसित झाल्या आहेत, हे आपणास माहिती असेलच. सिंधु नदी असो, गंगा नदी असो, यमुना असो किंवा सरस्वती असो. आपल्या नद्या आणि समुद्र हे आर्थिक आणि सामरिक, अशा दोन्ही बाबतीत महत्वाचे आहेत. संपूर्ण जगासाठीची ही प्रवेशद्वारे आहेत. या देशाचा, आपल्या या भूमीचा महासागरांशी अतूट संबंध आहे. जेव्हा आपण इतिहासावर नजर टाकतो, तेव्हा 800-900 वर्षांपूर्वी चोळ वंशाच्या काळात सर्वात समर्थ नौदलांमध्ये चोळ राजाच्या नौदलाची गणना केली जात असे. चोळ साम्राज्याच्या विस्तारात, साम्राज्याला त्या काळी आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपाला आणण्यात त्यांच्या नौदलाचा सिंहाचा वाटा होता. चोळ नौदलाच्या मोहिमा, संशोधन यात्रांची अनेक उदाहरणे, संगम साहित्यात आजही उपलब्ध आहेत. जगभरातील बहुतेक नौदलांमध्ये फार नंतरच्या काळात महिलांच्या समावेशाला परवानगी देण्यात आली, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. मात्र चोळ नौदलात, आणि ते सुद्धा 800-900 वर्षांपूर्वी महिलांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अगदी युद्धातही या महिला सहभागी झाल्या होत्या. चोळ शासकांकडे जहाज बांधणीचे अद्ययावत ज्ञान होते. नौदलाचा उल्लेख होत असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नौदलाचे सामर्थ्यही कसे विसरता येईल? सागरी वर्चस्व असणारा कोकणचा भूभाग शिवाजी महाराजांच्या राज्यात समाविष्ट होता. शिवाजी महाराजांशी संबंधित सिंधुदुर्ग, मुरुड-जंजिरा, स्वर्णदुर्ग असे अनेक किल्ले तर समुद्र किनारी भागात होते किंवा मग समुद्रातच उभे होते. मराठ्यांचे नौदल या किल्ल्यांचे संरक्षण करत होते. मराठ्यांच्या या आरमारात मोठ्या आणि लहान नौकांचा समावेश होता. त्यांचे नौसैनिक कोणत्याही शत्रुवर हल्ला करण्यास आणि हल्ल्यापासून स्वत:चा बचाव करण्यात पारंगत होते. मराठा आरमाराची चर्चा व्हावी आणि कान्होजी आंग्रे यांचा उल्लेख नसावा, हे तर केवळ अशक्य. त्यांनी मराठ्यांच्या आरमाराला नवे वैभव मिळवून दिले आणि अनेक ठिकाणी मराठा सैनिकांचे तळ उभारले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतीय नौदलाने अनेकदा पराक्रम गाजवला. गोवा मुक्ती संग्राम असो किंवा १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध असो. जेव्हा नौदलाचा उल्लेख होतो तेव्हा केवळ युद्धच नजरेसमोर येते. मात्र भारतीय नौदलाने मानवतेसाठीही मोलाचे काम केले आहे. याच वर्षी जून महिन्यात बांग्लादेश आणि म्यानमारवर मोरा चक्रीवादळाचे संकट ओढवले होते. आपल्या नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या युद्धनौकेने तातडीने बचावासाठी मदत केली आणि अनेक मच्छिमारांना पाण्यातून सुरक्षित बाहेर काढून बांग्लादेशकडे सुपूर्द केले. याच वर्षी मे-जून महिन्यात श्रीलंकेमध्ये मोठा पूर आला तेव्हा आमच्या नौदलाच्या तीन नौका तातडीने तेथे पोहोचल्या आणि त्यांनी तेथील सरकार आणि जनतेचे सहाय्य केले. बांग्लादेशमध्ये रोहिंग्यांसंदर्भात आपल्या नौदलाच्या आयएनएस घडियाल या युद्ध नौकेने मानवी सहाय्य केले होते. जून महिन्यात पापुआ न्यू गिनी सरकारने आम्हाला SOS संदेश दिला आणि त्यांच्या मच्छिमारी नौकेवरच्या मच्छिमारांना वाचवण्यासाठी आपल्या नौदलाने मदत केली. 21 नोव्हेंबर रोजी पश्चिम गल्फमध्ये एका व्यापारी जहाजावर समुद्री चाच्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळीसुद्धा आपल्या नौदलाची आयएनएस त्रिकांड ही युद्ध नौका मदतीसाठी धावून गेली. फिजीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे असो, तातडीची मदत करायची असो किंवा शेजारी देशांना मानवतावादी दृष्टीकोनातून मदत करायची असो, प्रत्येक वेळी भारतीय नौदलाने अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. आपण सर्व भारतीय, आपल्या या संरक्षण दलांबद्दल नेहमीच गौरव आणि आदराची भावना बाळगतो. लष्कर असो, नौदल असो किंवा वायुसेना असो, आपण सर्व देशवासी आपल्या जवानांचे शौर्य, धाडस, पराक्रम आणि बलिदानाला अभिवादन करतो. सव्वाशे कोटी भारतीयांना शांततेने, सुखाने जगता यावे, यासाठी हे जवान आपले तारूण्य, आपले आयुष्य देशावरून ओवाळून टाकतात. दर वर्षी 7 डिसेंबर रोजी सुरक्षा दले ध्वज दिन साजरा करतात. देशाच्या सुरक्षा दलांप्रती अभिमान आणि आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. या वर्षी संरक्षण मंत्रालयाने 1 ते 7 डिसेंबर दरम्यान एक विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत देशातील नागरिकांपर्यत पोहोचून त्यांना सुरक्षा दलांबाबत माहिती दिली जाणार आहे, त्यांच्या कामाबाबत जनजागृती केली जाणार आहे. संपूर्ण आठवडाभर लहान मुले, मोठी माणसे, सर्वांनी राष्ट्रध्वज लावा. देशभरात सैन्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी एक आंदोलन व्हावे. या प्रसंगी आपण लष्करी दलाचे ध्वज वितरीत करू शकतो. आपल्या अवती-भवती, आपल्या परिचयातील कोणीही सैन्यदलाशी संबंधित असतील तर त्यांचे अनुभव, त्यांच्या धाडसी कारवाया, त्यांच्याशी संबंधित चित्रफिती आणि छायाचित्रे #armedforcesflagday (hashtag armedforcesflagday) येथे पोस्ट करू शकतात. शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये सैन्यातील लोकांना आमंत्रित करून त्यांच्याकडून सैन्याच्या कामाबाबत अधिक माहिती घेता येईल. आपल्या नव्या पिढीला सैन्याबाबत अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने ही फार मोठी संधी आहे. आपल्या संरक्षण दलातील सर्व जवानांच्या कल्याणासाठी धन संकलित करण्याचीही हीच संधी आहे. सैनिक कल्याण मंडळामार्फत युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी, जखमी सैनिकांच्या कल्याणासाठी, त्यांच्या पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. आर्थिक योगदान देण्यासाठी ksb.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. आपण यासाठी रोखरहित पेमेंटसुद्धा करू शकता. या, आज या प्रसंगी आपल्या सशस्त्र सैन्यदलाचे मनोबल उंचावण्यासाठी आपणही योगदान देऊ या. त्यांच्या कल्याणासाठी आपणही हातभार लावू या.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिवस आहे. माझ्या शेतकरी बंधु-भगिनींनाही मी काही सांगू इच्छितो. मृदा अर्थात माती हा पृथ्वीचा एक महत्वपूर्ण घटक आहे. आपण जे काही खातो, ते सर्व काही या मातीशी संबंधित आहे. एका प्रकारे संपूर्ण अन्नसाखळीच मातीशी जोडलेली आहे. कल्पना करा, जर जगात पोषक मातीच नसेल तर काय होईल? कल्पना सुद्धा भितीदायक वाटते ना. माती नसली तर झाडे-झुडुपे उगवणार नाहीत, मग मानवी आयुष्याची तर कल्पनाच करायला नको. सजीव कसे तग धरणार? आपल्या संस्कृतीमध्ये फार पूर्वी याबाबत विचार करण्यात आला आणि त्याचमुळे मातीच्या महत्वाबाबत आपण फार पूर्वीपासून, अगदी प्राचिन काळापासून सजग आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये एकीकडे शेतीप्रती, मातीप्रती भक्ती आणि आदराची भावना लोकांच्या मनात अगदी स्वाभाविकपणे असेल, याचे सहज प्रयत्न होत राहिले आणि त्याचबरोबर अनेक वैज्ञानिक पद्धतींच्या वापरामुळे मातीचे पोषणही होत राहिले. या देशातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात दोन बाबींना फार महत्व आहे, आपल्या मातीविषयी भक्तीभाव आणि त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टीकोनातून तिची योग्य देखभाल. आपल्या देशातील शेतकरी परंपरांशी जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर आधुनिक विज्ञानाप्रतीही सजग आहेत, त्याचा शेतीमध्ये वापर करतात, याचा आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान वाटतो. हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर जिल्ह्यातील टोहू गाव, भोरंज ब्लॉक आणि तेथील शेतकऱ्यांबद्दल मी ऐकले आहे. तेथील शेतकरी पूर्वी असंतुलीत पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करत होते, त्यामुळे तेथील मातीचा दर्जा खालावला होता. उत्पादन घटत गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही घटले आणि मातीची उत्पादकताही कमी होत गेली. गावातील काही जागरूक शेतकऱ्यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखले आणि त्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी आपल्या मातीचे परीक्षण केले. जेवढी खते, पोषक तत्वे आणि जैविक खते वापरण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला, तो त्यांनी मान्य केला. परिणाम ऐकून आपणा सर्वांनाही आश्चर्य वाटेल की मृदा आरोग्य कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जी माहिती देण्यात आली, जे मार्गदर्शन मिळाले, त्याच्या अंमलबजावणीचे सकारात्मक परिणाम दिसून आले. रब्बी 2016-17 मध्ये गव्हाच्या उत्पादनात एकरी तीन ते चार पटीने वाढ झाली आणि उत्पन्नातही एकरी चार ते सहा हजार रूपये इतकी वाढ झाली. त्याचबरोबर मातीचा दर्जाही सुधारला. खतांचा कमी वापर झाल्यामुळे आर्थिक बचतही झाली. माझे शेतकरी बांधव मृदा आरोग्य कार्डवर दिलेल्या सल्ल्यावर अंमलबजावणी करण्यासाठी पुढे आले, हे पाहून मला मनापासून आनंद झाला आहे. सकारात्मक परिणाम पाहून या शेतकऱ्यांचा उत्साहही वाढत आहे. पिकाबद्दल काळजी वाटत असेल तर मातीची काळजी घेतली पाहिजे. आपण या जमिनीची, धरणी मातेची काळजी घेतली तर ती सुद्धा आपली काळजी घेईल, हे आता शेतकऱ्यांनाही पटू लागले आहे. आपल्या मातीची अधिक चांगली माहिती मिळावी आणि त्यानुसार पिक घेता यावे, यासाठी देशभरातल्या 10 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य कार्ड तयार करून घेतली आहेत. आपण धरणी मातेची भक्ती करतो मात्र युरीयासारखी खते या धरणीमातेच्या आरोग्यासाठी किती अपायकारक आहेत, याचा विचार आपण केला का? आवश्यकतेपेक्षा जास्त युरीयामुळे जमिनीची हानी होते, हे अनेक वैज्ञानिक प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे. शेतकरी तर या धरणी मातेचा सुपुत्र आहे. मग तो आपल्या मातेला आजारी कसे पडू देईल? माता आणि पुत्राचे हे संबंध पुनरूज्जीवीत करणे ही काळाची गरज आहे. 2022 सालापर्यंत, म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होतील, तोपर्यंत आपल्या शेतीसाठीच्या युरीयाचा वापर निम्म्यावर आणण्याचा संकल्प आमचे शेतकरी करू शकतील का? एकदा धरणी मातेच्या सुपुत्रांनी, शेतकऱ्यांनी हा संकल्प केला की धरणीच्या, जमिनीच्या आरोग्यात वेगाने सुधारणा होईल, उत्पादनातही वाढ होईल. शेतकऱ्याच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडून येईल.

जागतिक तापमान वाढ, वातावरणातील बदल, हे आता आपण अनुभवू लागलो आहोत. एक काळ असा होता, जेव्हा दिवाळीपूर्वी थंडी सुरू होत असे. आता डिसेंबर येऊन ठेपला आहे आणि अगदी सावकाश थंडी सुरू होते आहे.  थंडी सुरू झाली की अंथरूणातून बाहेर पडावेसे वाटत नाही, हा आपला सगळ्यांचाच अनुभव आहे. मात्र अशा ऋतूतही जागरूक असणारे लोक परिणामकारक काम करतात आणि त्यांची उदाहरणे आपल्या सगळ्यांनाच प्रेरणा देतात. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की मध्य प्रदेशमधील तुषार या अवघ्या ८ वर्षांच्या दिव्यांग बालकाने आपले गाव शौचमुक्त करण्याचा निर्धार केला. इतक्या मोठ्या स्तरावरचे काम आणि एवढा लहानसा मुलगा. मात्र निर्धार आणि संकल्प या सर्वांपेक्षा मोठा होता, सशक्त होता. आठ वर्षांचा मुलगा बोलू शकत नव्हता, पण त्याने शिट्टीचा आधार घेतला. सकाळी 5 वाजता उठून हा मुलगा गावातील घराघरात जाऊन हातवारे करून उघड्यावर शौच न करण्याबद्दल सांगत होता. रोज किमान 30-40 घरांमध्ये जाऊन स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या या बालकाच्या प्रयत्नांमुळे हे कुम्हारी गाव उघड्यावरील शौचमुक्त झाले. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी या लहानशा बालकाने खरोखरच प्रेरणादायी काम केले. स्वच्छतेच्या आग्रहाला वय नसते, मर्यादा नसते, हे यावरून दिसून येते. लहान असो किंवा मोठे, स्त्री असो वा पुरूष, स्वच्छता प्रत्येकासाठी महत्वाची आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आमचे दिव्यांग बंधु-भगिनी दृढ-निश्चयी आहेत, समर्थ आहेत, धाडसी आहेत आणि संकल्पाचे पक्के आहेत. प्रत्येक क्षणी काही नवे शिकायला मिळते. आज ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत. खेळ असो, स्पर्धा असो, सामाजिक उपक्रम असो, आमचे दिव्यांग कोणत्याच बाबतीत मागे नाहीत. आपणा सर्वांना आठवत असेल, रियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या दिव्यांग खेळाडूंनी उत्तम खेळ करत 4 पदकांची कमाई केली होती आणि अंधांच्या टी-ट्वेंटी क्रिकेटचा विश्वचषकही त्यांनी पटकावला. देशभरात अनेक प्रकारच्या स्पर्धा सुरू असतात. काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे 17 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील विविध भागांमधून आलेले दिव्यांग बंधू-भगिनी या स्पर्धेत सहभागी झाले. त्यांनी आपले कौशल्य दाखवले. त्यात गुजरातमधील 19 वर्षांचे जीगर ठक्कर यांचाही समावेश होता. त्यांच्या शरीराच्या 80 टक्के भागात मांसपेशी नाहीत, मात्र त्यांचे धाडस, संकल्प आणि मेहनत बघा. राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सहभागी झालेले 19  वर्षांचे जीगर ठक्कर, त्यांच्या शरीराच्या 80 टक्के भागात मांसपेशी नाहीत आणि त्यांनी 11 पदके जिंकली.  70 व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या याच कौशल्यामुळे 20-20 पॅरालिम्पीकसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणाने त्यांची निवड केली. 32 पॅरा जलतरणपटूंमध्ये त्यांचा समावेश आहे आणि या सर्वांना गुजरातमधील उत्कृष्टता केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. युवा जीगर ठक्कर यांच्या या धाडसाला मी अभिवादन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. आज दिव्यांगांसाठीच्या उपलब्धतेवर आणि त्यांना संधी प्राप्त करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती सशक्त असावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एका समावेशक समाजाची निर्मिती व्हावी. ‘सम’ आणि ‘मम’ भावनेतून समाजातील समरसता वाढावी आणि सर्वांनी एकत्रितपणे पुढे चालत राहावे.

काही दिवसांनंतर ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ साजरी केली जाईल. या दिवशी पैगंबर हजरत मोहम्मद साहेब, यांचा जन्म झाला होता. मी सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ईदचा हा सण समाजात शांतता आणि सद्‌भावना वाढविण्यासाठी आपल्या सर्वांना नवी प्रेरणा देईल, नवी उर्जा देईल, नवा संकल्प करण्याचे सामर्थ्य देईल, अशी आशा मला वाटते.    

(फोन-कॉल)

नमस्कार प्रधानमंत्री जी , मी कानपुरहून नीरजा सिंग बोलते आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही वर्षभरात ‘मन की बात’च्या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्या, त्यातील सर्वात चांगल्या दहा गोष्टी पुन्हा एकदा आम्हाला सांगा. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टी पुन्हा आठवतील आणि आम्हाला आणखी काही नवे शिकता येईल. धन्यवाद.

(फोन-कॉल समाप्त)

आपण योग्य तेच बोलताय. 2017 वर्ष संपते आहे, 2018 ची चाहूल लागली आहे. आपण फारच चांगली सूचना केली आहे. आपले बोलणे ऐकल्यानंतर मला त्यात आणखी भर घालावीशी वाटते, बदल करावासा वाटतो. आपल्याकडे गावात जी जुनी-जाणती माणसे असतात, ती नेहमी सांगतात, दु:ख विसरा, सुखाचा विसर पडू देऊ नका. दु:ख विसरा, सुखाचा विसर पडू देऊ नका. मला वाटते, आपण या गोष्टीचा प्रसार केला पाहिजे. आपणही 2018 मध्ये शुभ गोष्टींचे स्मरण करत शुभ संकल्प करत प्रवेश करावा. आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे, कदाचित जगभरातही वर्षाच्या अखेरीस सर्व जण आढावा घेतात, चिंतन-मनन करतात, मंथन करतात आणि पुढच्या वर्षासाठी योजना तयार केल्या जातात. आपल्याकडे प्रसार माध्यमे तर वर्षभरातील स्मरणीय घटनांच्या आठवणी नव्याने ताज्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मकही असतात. मात्र 2018 मध्ये प्रवेश करताना आपण चांगल्या गोष्टी आठवत, चांगले करण्याचा विचार करावा, असे तुम्हाला वाटत नाही का? मी आपणा सर्वांना एक सल्ला देतो. ज्या काही 5-10 चांगल्या सकारात्मक बाबी आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील आणि ज्या जाणून घेतल्यावर लोकांच्या मनातही शुभ भावना जागतील. आपण यात योगदान देणार का? या वर्षी आपण आपल्या आयुष्यातील 5 सकारात्मक अनुभव आम्हाला सांगू शकता का? मग ते छायाचित्र असो, लहानसा किस्सा असो, गोष्ट असो किंवा लहानशी ध्वनीचित्रफीत असो. मी निमंत्रित करतो की 2018 चे स्वागत आपल्याला शुभ वातावरणात करायचे आहे, शुभ आठवणींसोबत करायचे आहे. सकारात्मक विचारांसह करायचे आहे. सकारात्मक गोष्टींना उजाळा देऊन करायचे आहे.

    या, NarendraModi App वर, MyGov वर किंवा social media वर #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) सह सकारात्मक बाबी शेअर करा. इतरांना प्रेरणा देणाऱ्या घटनांना उजाळा द्या. चांगल्या गोष्टी कराल तर चांगले करावे, असे मनातून वाटेल. चांगल्या गोष्टींमधून अधिक चांगले करण्याची उर्जा मिळते. शुभ-भावना, शुभ-संकल्पांची प्रेरणा देतात. शुभ-संकल्प, शुभ-परिणाम प्रदान करतात.

या, या वेळी #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) पहा. बघा, या वर्षी आपण सगळे मिळून एक जबरदस्त सकारात्मक वातावरण निर्माण करून नव वर्षाचे स्वागत करू. या एकत्रित प्रयत्नांची ताकत आणि त्याचा प्रभाव आपण सगळे मिळून पाहू. मी निश्चितच ‘मन की बात’ च्या पुढच्या अध्यायात #PositiveIndia (हॅशटॅग Positive India) वर आलेले अनुभव देशवासीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, पुढच्या महिन्यात, ‘मन की बात’ साठी पुन्हा एकदा आपणा सर्वांशी संवाद साधेन. अनेक गोष्टी बोलायची संधी मिळेल. अनेकानेक आभार!! 

 
/MH/1
सप्रे --अनघा

Click here to download high quality photo

    Click here to download high quality photo

more photos ....
MEDIA UNITS

PIB MAIN SITE (DELHI)

DD NEWS

AIR NEWS

D A V P

R N I

D F F

GOVERNMENT LINKS

PRESIDENT

PRIME MINISTER

CENTRAL GOVERNMENT

MAHA. GOVERNMENT

MAHARASHTRA MEDIA

MEDIA LIST

NEWSPAPERS

TELEVISION MEDIA

MEDIA REGULATION

CABLE REGULATION

CONTENT CODE

ADVERTISING CODE

PROGRAMMING CODE

JOURNALIST CORNER

JOURNALISM BASICS

INDIAN SCHOOLS

INT.SCHOOLS

PIB LIBRARY

OTHER LINKS

INDIAN AIRLINES

INDIAN RAILWAYS

BUSES


This Site Content Administered by : Manish Desai, Director (M&C),
Press Information Bureau, Mumbai
Site is designed and hosted by National Informatics Centre (NIC)
Information is provided and updated by :Press Information Bureau